🌟आरटीआय कार्यकर्ते तथा समाजसेवक स.जगदीप सिंघ नंबरदार यांची प्रशासकांकडे मागणी🌟
नांदेड :- नांदेड येथील हजूर साहिब गुरुद्वारा बोर्डातील अनेक ज्येष्ठ कर्मचाऱ्यांना डावलून नियमबाह्यरित्या पदोन्नत्या देण्यात आले आहेत अशा सर्व नियमबाह्य पदोन्नत्या रद्द करून पात्र कर्मचाऱ्यांना पदोन्नती द्यावी अशी मागणी आरटीआय तथा सामाजिक कार्यकर्ते जगदीपसिंघ नंबरदार यांनी गुरुद्वारा बोर्डाचे प्रशासक डॉ. विजय सतबीरसिंघ यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
गुरुद्वारा बोर्डातील कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र नागरी सेवा कायदा लागू होतो. या कायद्याप्रमाणे बोर्डातील कर्मचाऱ्यांच्या ज्येष्ठतेनुसार पदोन्नत्या होणे आवश्यक आहे. परंतु या नियमावली डावलून माजी प्रशासक भूपेंद्रसिंघ मिन्हास व माजी आ. तारासिंघ यांच्या कार्यकाळामध्ये आजी-माजी सदस्यांच्या शिफारसीवर अनेक ज्येष्ठ कर्मचाऱ्यांना डावलून कनिष्ठ कर्मचाऱ्यांना लंगर व सुरक्षा विभागामध्ये लिपिक, वरिष्ठ लिपिक, मुख्य लिपिक व सुपरवायझर पदावर पदोन्नत्या देण्यात आल्या आहेत. तर 12 ते 15 वर्षे सेवा पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांना सेवादार म्हणून काम करावे लागत आहे. याची आस्थापना विभागाचे अभिलेखांची चौकशी करून नियमबाऱ्हय पदोन्नत्या रद्द करून पात्र कर्मचाऱ्यांना देण्याची मागणी नंबरदार यांनी केली आहे. शिफारसीच्या जोरावर दहावी व बारावी पास कर्मचारी मोठ्या पदावर काम करत आहेत तर शिफारसी अभावी पदवी - पदव्युत्तर शिक्षण झालेल्या कर्मचाऱ्यांना सेवादार म्हणून काम करावे लागत आहे.याची वरिष्ठ स्तरावर चौकशी समिती नेमून कारवाई होणे आवश्यक आहे असे नंबरदार यांनी म्हटले आहे.
गुरुद्वारा बोर्डाचे तत्कालीन प्रशासक डॉ. परविंदरसिंघ पसरीचा यांनी जुलै 2022 रोजी रोजंदारीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवेत कायम केले होते त्यानंतर एप्रिल 2023 मध्ये त्यातील 162 कर्मचाऱ्यांना पदोन्नतीचे आदेश दिले होते. त्यावर देण्यात आलेली स्थगिती उठवून त्यांचा पदोन्नतीचा मार्ग मोकळा करावा व विविध ठिकाणच्या गुरुद्वारावर बारा ते पंधरा वर्षापासून पुजारी म्हणून कार्यरत कर्मचाऱ्यांना ग्रंथीसिंघचा ग्रेड देऊन वेतनवाढ द्यावी अशी मागणी देखील आरटीआय तथा सामाजिक कार्यकर्ते जगदीपसिंघ नंबरदार यांनी गुरुद्वारा बोर्डाचे प्रशासक डॉ. विजय सतबीरसिंघ यांच्याकडे केली आहे.......
0 टिप्पण्या